अभिजात मराठी
भाषा समितीच्या कामकाजाचा
मुख्यमंत्र्यांनी घेतला
आढावा
पुणे, दि. 7 : मराठी भाषेला अभिजात
दर्जा मिळण्यासाठी नेमलेल्या अभिजात मराठी भाषा समितीने केलेल्या कामकाजाचा अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आज यशदा येथे आयोजित
बैठकीत सादर केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने
समिती नेमली आहे. आजच्या बैठकीत मराठी भाषा विभागाचे सचिव विजय नाहटा यांनी मुख्यमंत्री
व उपस्थित सदस्यांचे स्वागत करुन समितीच्या कामाची माहिती दिली.
केंद्र शासनाकडून तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांना
अभिजात दर्जा देण्यात आला आहे. मराठी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत राज्य
शासनाने एक तज्ज्ञ समिती गठीत केली आहे. या समितीने मराठी भाषेचा समृध्द इतिहास अतिशय
अल्पकाळात समोर आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. या समितीचा
मसुदा आल्यानंतर त्यावर एक प्रस्ताव तयार करुन केंद्राकडे पाठवू आणि त्याचा पाठपुरावा
करु, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आजपर्यंत मराठी भाषा केवळ बाराशे
ते तेराशे वर्ष जुनी असावी असा समज होता. पण या समितीने मराठी
भाषेचे संदर्भ दोन हजार वर्षे जुने असल्याचे दाखवून दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितले.
मराठी भाषेवर अधिक सखोल संशोधनासाठी एक कायमस्वरुपी मराठी भाषा संशोधन अध्यासन
निर्माण करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या अध्यासनात मराठी,
प्राकृत, मराठी व्याकरण, विविध मराठी बोली भाषा यावर अधिक संशोधन करता येईल, असे त्यांनी सांगितले.
श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोषाबरोबर इतर दुर्मिळ प्राचीन मराठी ग्रंथांचेही
पुर्नमुद्रण करण्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
या आढावा बैठकीला मराठी भाषा विभागाचे सचिव विजय नाहटा, समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे, सदस्य सर्वश्री प्रा. हरी नरके, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. कल्याण काळे, सतीश काळसेकर, प्रा. आनंद उबाळे, डॉ. मैत्रेयी देशपांडे, परशुराम पाटील, संचालक,
भाषा संचालनालय आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीचे प्रास्ताविक विजय नाहटा यांनी केले तर हरि नरके यांनी आभर मानले.
000
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी
उपयुक्त सूचना,
पुरावे पाठविण्याचे आवाहन
मुंबई, दि. 7 : मराठी भाषेच्या
अभिजातपणाचा योग्य पाठपुरावा करण्यासाठी राज्य शासनाने प्रा. रंगनाथ पठारे यांच्या
अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या वतीने मराठीच्या
अभिजाततेचा प्रस्ताव सर्व मराठी भाषिकांच्यावतीने तयार करण्यात येत आहे. या
अभ्यासपूर्ण कार्याच्या पूर्ततेसाठी राज्यातील भाषा तज्ज्ञ व्यक्ती,
साहित्यिक, इतिहास संशोधक यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग हा
प्रस्ताव तयार करताना व्हावा यासाठी त्यांच्याकडे मराठीच्या अभिजाततेचा पुरावा
म्हणून उपयुक्त ठरणाऱ्या ज्या ज्या सूचना असतील त्या त्यांनी त्वरित समितीला
कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र
शासनाच्या निकषानुसार प्रस्ताव तपासून एक अभ्यासपूर्ण व सर्वंकष प्रस्ताव तयार
करुन हा
प्रस्ताव केंद्र शासनास दोन महिन्यांच्या आत सादर करण्याचे प्रस्तावित आहे. तरी
आपल्या सूचना व संबंधित साहित्य हे अवर सचिव, मराठी भाषा विभाग, नविन प्रशासन
भवन, 8 वा मजला, मंत्रालय, मुंबई 32,
फॅक्स-22836877, ईमेल-marathibhasha.123@gmail.com या पत्त्यावर
तसेच प्रा. हरी नरके अध्यासन- प्राध्यापक, महात्मा फुले अध्यासन, पुणे विद्यापीठ,
प्रकाशन विभागाजवळ, पुणे- 411007, फॅक्स - 020-25601175,
ईमेल-
harinarke@gmail.com या पत्त्यावर पाठवाव्यात असे, आवाहन समितीतर्फे
करण्यात आले आहे.
अवर सचिव (भाषा) मराठी भाषा विभाग या समितीचे सदस्य
सचिव असून प्रा. हरी नरके; डॉ. नागनाथ कोत्तापल्ले; डॉ. श्रीकांत बहुलकर; प्रा.
कल्याण काळे; प्रा. मधुकर वाकोडे; श्री. सतीश काळसेकर; प्रा.आनंद उबाळे; डॉ.
मैत्रेयी देशपांडे; श्री. परशुराम पाटील ; संचालक, भाषा संचालनालय, मुंबई; संचालक,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई; संचालक, दर्शनिक विभाग, मुंबई; सचिव, महाराष्ट्र
राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई ; सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश
निर्मिती मंडळ, मुंबई यांची समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती
करण्यात आली आहे.
समितीमार्फत तयार करण्यात येत असलेला हा प्रस्ताव
मराठी भाषिकांच्या सक्रीय सहभागातून सर्वव्यापक होणे अपेक्षित आहे, तरी आपल्या
सूचना व पुरावे त्वरित पाठवावेत असे, आवाहन मराठी भाषा
विभागामार्फत करण्यात आले आहे.
000

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा