बुधवार, ४ जानेवारी, २०१२



विद्यार्थ्यांनी देशाच्या आर्थिक सामाजिक प्रगतीमध्ये योगदान द्यावे
                                                                                                                        -  मुख्यमंत्री

            मुंबई, दि.4:  विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे. उद्ष्टि डोळयापुढे ठेवून वाटचाल करावी. विद्यार्थ्यांनी भविष्यात देशाच्या आर्थिक सामाजिक प्रगतीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय अंर्तगत कार्यरत असलेल्या डॉ.आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ.आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे डॉ.आंबेडकर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष एफ. ए. जकपनवारजी, सदस्य सचिव संजीवकुमार उपस्थित होते. 
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, माणसाच्या जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. मागासलेल्या लोकांसाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि जिद्द ठेवून अभ्यास केल्यास त्यांना जीवनात यश संपादन करता येईल. विद्यार्थ्यांनी बंधुभाव वाढविण्यासाठी काम करावे तसेच भविष्यात देशाच्या आर्थिक, सामाजिक प्रगतीमध्ये योगदान द्यावे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पारितोषिक विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे यावेळी अभिनंदन केले.
            याप्रसंगी बोलताना मुकुल वासनिक म्हणाले की, आज जे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत त्यांनी पुढील आयुष्यात अधिकाधिक यश संपादन करुन मागील विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श निर्माण करावा.
            देशभरातील विविध परीक्षामंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर फाँउण्डेशनच्या वतीने डॉ. आंबेडकर राष्ट्रीय मेरिट पारितोषिक देवून सन्मान करण्यात येते.  सन 2010-11 या वर्षात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या देशभरातील 84 विद्यार्थ्यांचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा