रविवार, १ जानेवारी, २०१२


कोरडवाहु शेतक-यांसाठी 10 हजार कोटींचा कार्यक्रम राबविणार
                                                                                  -मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
      सोलापूर दि. 1 : राज्य शासनाने लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या असून त्याची अंलबजावणी लवकरच करण्यात येईल. तसेच आगामी काळात रुग्णांच्या सेवेसाठी एक हजार अम्ब्युलन्सची सेवा सुरु करण्यात येणार असून राज्यातील कोरडवाहू शेतक-यांसाठी 10 हजार कोटींचा कार्यक्रम राबवीण्यात येणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
      सोलापूर येथील सामाजिक न्याय भवन, डॉ. व्दारकानाथ कोटणीस स्मारक व शाहीर अण्णाभाऊ साठे पुर्णाकृती पुतळयाचे आनावरण आणि राजीव गांधी जीवनदायी योजनेतंर्गत आरोग्य कार्डाचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, महापौर आरिफ शेख, आमदार गणपतराव देशमुख, सिद्रामप्पा पाटील, दिलीप माने, प्रणिती शिंदे, दिपक साळुंखे, चिनचे विशेष प्रतिनिधी न्यु क्विंन्बाओ, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांच्यासह महापालिका पदाधिकारी उपस्थित होते.
      मुख्यमंत्री श्री. चव्हाण पुढे म्हणाले की राज्य शासनाकडुन 13 लाख विद्यार्थ्यांना 1355 कोटी रुपयांची ई-स्कॉलरशीप देण्यात येत आहे. तर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील 2 कोटी 4 लाख कुटुंबांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये 972 प्रकारच्या शस्त्रक्रीयेसह विविध प्रकारच्या आजारांसाठी आरोग्य सेवा रुग्णालयांकडून प्राप्त होणार आहे. अनुसूचित जाती,  जमाती आणि आदिवासी लोकसंख्येच्या तुलनेत अंदाजपत्रक तयार करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचा उल्लेख यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.

      डॉ. कोटणीस यांच्या विषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सातासमुद्रापार जाऊन भारताच्या एका ध्येयवादी तरुणाने गरिबांची सेवा सुश्रृशा केली. त्यांचे हे काम भारतातील सर्व तरुणांना आदर्शवत असेच आहे. आज सोलापूरकरांनी त्याची आठवन ठेवून त्यांचे स्मारक उभारुन त्यांना एक प्रकारे आदरांजली वाहीली आहे. त्यांच्या राहत्या घरात सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातुन चिनी भाषेचे वर्ग सुरु करण्याच्या महापालिकेच्या निर्णयास शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
      अण्णाभाऊ साठे हे शेतक-यांसाठी, कामगारांसाठी लढणारे व्यक्तीमत्व होते. मुंबईच्या झोपडपट्टीवासीयांच्या व्यथा आपल्या साहित्येतील कथेमधुन त्यांनी प्रभावीपणे मांडल्या. जीद्द व प्रतिभेची क्षमता या जोरावर त्यांनी हे साहित्य भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय झाले. अशा या थोर व्यक्तीच साहित्य इतर भाषांमध्ये प्रकाशीत होण गरजेच आहे. या करीता सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या  भाषा विभागामार्फत एका विशेष मोहिमेव्दारे हिंदी, इंग्रजी भोषेत या साहित्याच रुपांतर करुन देशभर पोहचविल्या जाण्यासाठी यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी मदत करील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी दिली. सामाजिक न्याय भवनाच्या माध्यमातून आता सर्व समाज कल्याण विभागाशी निगडीत सर्व कार्यालये एकाच छताखाली मिळणार असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
      केंद्रीय ऊर्जामंत्री श्री. शिंदे म्हणाले की, एका विशिष्ट तत्वज्ञानाने भारत देश भारलेला असून डॉ. कोटणीस यांच लोकसेवेच काम त्याचेच प्रतिक आहे. समाजवादी समाज रचना लोकशाही माध्यमातुन स्विकारणा-या भारत देशात हातातील लेखणीच्या जोरावर साहित्यातील सामर्थ्य ओळखुन अण्णाभाऊंनी गरीब जनतेच चित्रण शब्दात व्यक्त केलं. या मानवतावादी दोन्ही प्रतिकांचा आदर सगळया जनतेने बाळगावा अशी आपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

      पालकमंत्री श्री. ढोबळे म्हणाले की, दलीत समाजाला प्रेरणा देण्याची भुमिका सामाजिक न्याय भवनाच्या माध्यमातुन होणार आहे. शाहु, फुले, आंबेडकर यांनी दबलेल्या नागरिकांना जगण्याची प्रेरणा दिली. अण्णाभाऊंनी स्वाभिमान जतन करणा-या व्यक्तीरेखा आपल्या लेखणीतुन उभ्या केल्या. त्यांच्या या मानवी मुल्यांच जतन करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी सोलापूर जिल्यातील नव्या विमानतळासाठी 20 कोटी, देगांव एक्सप्रेस कॅनलसाठी 50 कोटी रुपयांचा निधी त्वरीत देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. पंढरपूर प्राधिकरण कामाला वेग देऊन आष्टी उपसा जलसिंचन योजना लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंतीही केली.
      सामाजिक न्याय मंत्री श्री. मोघे यांनी समाज कल्याण खात्यामार्फत अनुसूचित जाती जमातीसाठी राबविण्यात येणा-या योजनांची माहिती देऊन घरकुल योजनेचा आर्थिक वर्ष 2011-12 मध्ये 1 लाख 86 हजार कुटुंबांना लाभ दिल्याचे सांगितले. व्यसनमुक्तीसाठी आणि राज्याच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
      आरोग्य मंत्री श्री. शेट्टी यांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य  योजनेची माहिती दिली. सोलापूर जिल्हयात नवीन वर्षात या योजनेअंतर्गत प्रथमच आरोग्य पत्रांचे वाटप होत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
      चीनचे विशेष प्रतिनिधी न्यु क्विंन्बाओ यांनी भारत - चिन मैत्रीचे डॉ. कोटणीस जीवंत उदाहरण असल्याचा उल्लेख केला.  कार्यक्रमाचे प्रास्तविक महापौर आरिफ शेख यांनी तर आभार सभागृह नेते देवेंद्र भंडारे यांनी केले.



                              00000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा