विदर्भात कापूस प्रक्रिया उद्योगाला चालना देणार
.. मुख्यमंत्री
नागपूर, दिनांक 24 : विदर्भात कापूस हे नगदी पीक सर्वत्र घेतले जाते. मात्र कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग या भागात नसल्याने येथील शेतकरी आणि बेरोजगारांना पाहिजे तेवढा फायदा मिळत नाही. म्हणून विदर्भात कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यावर भर देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मोहपा येथे दिले.
मोहपा नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत रस्त्याचे व बैलबाजार विकास कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री शिवाजीराव मोघे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. वित्त, नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक, मोहपा नगरपालिकेच्या अध्यक्षा शीलाताई खाटीक, उपाध्यक्ष समशुद्दीन शेख, माजी मंत्री रमेश बंग, जिल्हा परिषदेचे सदस्य राजीव जीवतोडे मंचावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात कापूस व साखरेच्या उत्पादनाने उच्चांक गाठला असता निर्यातीवर बंदी आल्याने त्याचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळाला नाही. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. बी.टी. व अन्य वाणाच्या कपासीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने या भागात कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यावर आपला भर राहील, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी कर्जासाठी सावकाराकडे हात पसरू नये म्हणून पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत योजनेंतर्गत 50 हजारावरची कर्ज मर्यादा आता एक लाख रुपयापर्यंत करण्यात आली. यावर व्याज नसून एक ते तीन लाखापर्यंतच्या कर्जासाठी दोन टक्के व्याज आकारण्यात येईल. राजीव गांधी जीवन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील दोन कोटी लाभर्थ्यांना एक लाख रुपयापर्यंतचा मोफत औषधोपचार, जीवन सुरक्षा योजनेंतर्गत राज्यातील गरिबांच्या सामाजिक सुरक्षिततेची जबाबदारी शासनाने घेतली आहे. नागरिकांची कुचंबना होऊ नये म्हणून ई-प्रशासनाच्या माध्यमातून ई-सेवा दाखले देण्यात येत आहेत. राज्यातील संपूर्ण शेत जमिनीच्या पुनर्रमोजणीचा कार्यक्रम येत्या 5 वर्षात राबविण्यात येईल. बंदमुळे आणि कोळसा खाणीत पाणी गेल्यामुळे कोळशाची आयात घटल्याने राज्यात मानव व नैसर्गिकरित्या विजेचे संकट निर्माण झाले होते. राज्यात विजेची मागणी वाढली असून जैतापूरसह नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यास वीज टंचाई दूर होईल. सध्या सोयाबीन मळणीचा हंगाम असल्याने शहरी भागात ज्यादा लोडशेडींग करून ग्रामीण भागात वीज पुरवठा करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी मिहान प्रकल्पाला राज्य शासनाने गती दिल्याने दोन महिन्यात कामे सुरु होतील. तसेच नगरपालिकेच्या विकासात अडथळा ठरणऱ्या झुडपी जंगलाचा प्रश्न सोडविण्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनीही मोहपा नगरपालिकेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
माजी मंत्री रमेश बंग यांनी कापसाला सहा हजार रुपये भाव व कापसावरील निर्यातबंदी उठविणे आणि मेट्रोरिजनमुळे अंशत: तालुका बाधित होत असल्याने त्यातून सूट मिळावी, अशी मागणी केली. श्री. वीरेंद्र बैस यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक नगरपरिषदेचे उपाध्यक्ष समशुद्दीन शेख यांनी केले. नगरपालिकेच्या विकास कामाची माहिती त्यांनी यावेळी दिली. आभार नगराध्यक्षा शीलाताई खाटीक यांनी मानले.
बांधकाम सभापती नत्थुजी यावलकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. चांदेकर, शिक्षण सभापती बशीर पटेल, राजेश देशमुख, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. अमीत सैनी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, विद्याधर अंधारे,नगरपालिकेचे सदस्य, मोहपा व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा