मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०११

मंत्रिमंडळ निर्णय : दिनांक : 25 ऑक्टोबर, 2011


मंत्रिमंडळ निर्णय : दि : 25 ऑक्टोबर, 2011

                                   प्रत्येक गावात व्हिलेज मॉलच्या रुपाने
            हक्काचे विक्री केंद्र उपलब्ध होणार
             
प्रत्येक गावात व्हिलेज मॉल उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला.  यामुळे गावातील स्वरोजगारी व्यक्तींना आणि महिला बचत गटांना हक्काचे आणि सुविधायुक्त विक्री केंद्र उपलब्ध होणार आहे.
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत गाव, जिल्हा व राज्यस्तरीय कायम स्वरुपी  विक्री केंद्र बांधण्याची 75 टक्के केंद्र सरकारचा निधी व 25 टक्के राज्य सरकारची निधी असा आर्थिक सहभाग असलेली योजना स्विकारण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने  घेतला.  राज्य शासनातर्फे तालुका  विक्री केंद्र बांधण्याची योजना पुढे  सुरु ठेवण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
           स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत (SGSY) दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील स्वरोजगारींनी  तयार केलेल्या वस्तूंना हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळण्याकरिता गाव, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर कायमस्वरुपी विक्री केंद्र बांधण्याची ही योजना आहे. ही विक्री केंद्रे मॉल स्वरुपाची असतील. यामध्ये विक्री केंद्रासोबतच महिला बचत गटांच्या कार्यकर्त्याना विश्रामगृहाची व स्वच्छतागृहाची सुविधाही उपलब्ध असेल.
           गावस्तरावरील केंद्रासाठी रु. 15 लाख, जिल्हास्तरावरील केंद्रासाठी 1 कोटी 50 लाख व राज्यस्तरावरील केंद्रासाठी तीन कोटी रुपये खर्चाचे विक्री केंद्र बांधण्याची ही योजना आहे. यापैकी 75 टक्के निधी केंद्र सरकारकडून मिळतो व 25 टक्के राज्य सरकार खर्च करते.
           केंद्राच्या योजनेत तालुका विक्री केंद्राचा (रु. 25 लाख) समावेश नसल्याने राज्य  शासनाची 100 टक्के राज्य शासन अनुदानित तालुका स्तरावरील कायमस्वरुपी विक्री केंद्र बांधण्याबाबतची योजना सुरु राहील. सद्या 129 तालुका विक्री केंद्रांचे बांधकाम सुरू आहे. 2011-12 मध्ये राज्य योजनेत 158 तालुका स्तरावरील  विक्री केंद्र बांधण्याचे उद्दिष्ट आहे.          सन 2011-12 मध्ये जिल्हास्तरावरील दहा विक्री केंद्र व राज्य स्तरावरील विक्री केंद्र  बांधण्यासाठीचे प्रस्ताव केंद्र  शासनाकडे पाठविण्यात येतील.
            केंद्राने ग्रामपंचायत स्तरावर 99 केंद्र मंजूर केली असून 5 कोटी 56 लाख रुपये केंद्राचा हिस्सा वितरीत केला आहे. आजच्या निर्णयानुसार राज्याचा 25 टक्के हिस्सा   (रु. 1.85 कोटी) या वर्षी वितरीत करण्यात येईल.
-----00-------
                                                                                                   
आता मुद्रांक शुल्क ई-पेमेंटद्वारेही भरता येईल
             
परंपरागत पध्दतीसोबतच ई-पेमेंटद्वारे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) व नोंदणी फी (Registration Fees) चा भरणा इंटरनेट बँकिंगद्वारे  भरण्याची सुविधा जनतेस उपलब्ध करून देण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
सध्या मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 मधील अनुसूची-1 मध्ये नमूद केलेल्या दस्तांवर उमट मुद्रांक, फ्रॅकींग मशिन, रोखीने दर्शनी (डिमांड ड्राफ्ट) व ई-धनादेशद्वारे (पे-ऑर्डर) मुद्रांक शुल्काचा भरणा करण्यात येतो.  या परंपरागत पध्दती व्यतिरिक्त मुद्रांक शुल्काचा भरणा ई-पेमेंटद्वारे करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ई-पेमेंटद्वार जमा होणारे मुद्रांक शुल्क Government Receipt Accounting system-GRAS (Virtual Treasury) मध्ये जमा करावयाचे आहे.
मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 मधील तरतुदीनुसार आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क व नोंदणी अधिनियम 1908 मधील तरतुदीनुसार आकारण्यात येणारी नोंदणी फी ई-चलनाद्वारे भरण्याबाबतची तरतूद करण्यासाठी या अधिनियमात आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.
- - - - - 0- -  - - -

राज्यातील सहकारी सूत गिरण्यांच्या अडचणी
दूर करण्यासाठी शासनातर्फे बिनव्याजी कर्ज
             
            राज्यातील चालू असलेल्या सहकारी सूत गिरण्यांच्या उत्पादनापैकी एप्रिल ते सप्टेंबर 2011 या कालावधीत झालेल्या सूत उत्पादनावर प्रति किलो 20 रुपये या दराने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
वस्त्रोद्योग व्यवसायात असलेली जागतिक व देशांतर्गत आर्थिक मंदी, कापसाचे मोठ्या प्रमाणात वाढलेले भाव, सूताच्या मालास भाव व मागणी नसल्याने मागील 8 ते 9 महिन्यांपासून वस्त्रोद्योग व्यवसाय अडचणीत आलेला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ व विविध सहकारी सूत गिरण्यांचे प्रतिनिधी यांनी या व्यवसायास अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी राज्य शासनाकडे केली होती.  त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे 56 सहकारी सूत गिरण्यांना 108 कोटी 77 लाख रुपये विनव्याजी कर्ज उपलब्ध होईल.  हे बिनव्याजी कर्ज एक वर्ष सवलतीच्या कालावधीनंतर समान तीन वार्षिक हप्त्यात संबंधित सहकारी सूत गिरण्यांनी शासनास परत करावयाचे आहे.                                   
------00------
लातूर व चंद्रपूर येथे महापालिका स्थापन करण्यास मंजुरी

            लातूर आणि चंद्रपूर या शहरांची लोकसंख्या तीन लाखांपेक्षा जास्त झाल्यामुळे तेथे नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत करण्यास राज्यमंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. वाढत्या नागरिकरणामुळे शहरांची लोकसंख्या वाढत आहे.  नागरिकांना पुरेशा सोयी-सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने लातूर आणि चंद्रपूर या शहरांमध्ये महानगरपालिका स्थापन करावी अशी मागणी होती.  त्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या दोन्ही नगरपालिकांना मिळणारे शासनाचे अनुदान 30 सप्टेंबर 2012 पर्यंत सुरु राहील.
----00-----

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०११

दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला संदेश


दिवाळी प्रदूषणमुक्त वातावरणात
साजरी करुन पर्यावरणप्रेमी बना
                                - मुख्यमंत्र्यांचे आवाहन
                                                                              
      मुंबई दि. 24 ऑक्टोबर :  पर्यावरणाचे संरक्षण हे आपणा सर्वांसमोरील मोठे आव्हान आहे. एक जागरुक नागरिक म्हणून प्रत्येकाने प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणयुक्त वातावरणात दिवाळीचा सण साजरा करावा आणि पर्यावरणमित्र बनावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
      दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात "दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा, प्रसन्नतेचा आणि प्रकाशाचा उत्सव आहे. अज्ञानाच्या अंध:कारातून ज्ञानाच्या प्रकाशाचा संदेश देणारा हा उत्सव आहे.  दीपोत्सव हा केवळ दिवे-पणत्या लावण्यापुरताच मर्यादित नाही. दिवा किंवा पणती हे ज्ञानाचे प्रतीक आहे.  चांगल्या गोष्टींच्या स्वागतासाठी दिवे लावले जातात.  आपला आनंद इतरांबरोबर वाटणे आणि इतरांचे दु:ख आपण वाटून घेणे हे दिवाळीच्या सणाद्वारे आपण शिकतो.  सर्व समाजबांधवांसोबत दीपोत्सवाचा सण साजरा करण्याची आपली परंपरा आहे. हा सण प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणयुक्त वातावरणात साजरा करावा असे आवाहन करून मुख्यमंत्र्यांनी ही दीपावली राज्यातील जनतेला सुख-समृध्दीची प्रकाश देणारी ठरावी" अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.
----0----

कटारीया कुटुंबाचे सांत्वन



मुख्यमंत्र्यांनी केले कटारीया कुटुंबियांचे सात्वन
नागपूर,दिनांक 24 :  मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांचे काल रात्रौ विमानाने जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यासाठी नागपूरात आगमन झाले. त्यांनी आज सकाळी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून नागपूरातील सूर्यनगर भागात गेले आणि त्यांनी कटारीया कुटुंबाचे सांत्वन केले.
अलिकडेच आठ वर्षीय कुश कटारीया या बालकाचे अपहरण करुन निर्घृन हत्या झाली होती.
या भेटी प्रसंगी पालकमंत्री शिवाजीराव मोघे, रोजगार हमी योजनामंत्री डॉ.नितीन राऊत, राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सतिश चतुर्वेदी, जयप्रकाश गुप्ता, पोलीस आयुक्त डॉ.अंकुश धनविजय इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
                                                * * * * *

मोहपा नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन


विदर्भात कापूस प्रक्रिया उद्योगाला चालना देणार
                               .. मुख्यमंत्री  
        नागपूर, दिनांक 24 : विदर्भात कापूस हे नगदी पीक सर्वत्र घेतले जाते. मात्र कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग या भागात नसल्याने येथील शेतकरी आणि बेरोजगारांना पाहिजे तेवढा फायदा मिळत नाही. म्हणून विदर्भात कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यावर भर देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मोहपा येथे दिले.
        मोहपा नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत रस्त्याचे बैलबाजार विकास कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री शिवाजीराव मोघे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. वित्त, नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक, मोहपा नगरपालिकेच्या अध्यक्षा शीलाताई खाटीक, उपाध्यक्ष समशुद्दीन शेख, माजी मंत्री रमेश बंग, जिल्हा परिषदेचे सदस्य राजीव जीवतोडे मंचावर उपस्थित होते.
        मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात कापूस साखरेच्या उत्पादनाने उच्चांक गाठला असता निर्यातीवर बंदी आल्याने त्याचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळाला नाही. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. बी.टी. अन्य वाणाच्या कपासीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने या भागात कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यावर आपला भर राहील, असे त्यांनी सांगितले.
        शेतकऱ्यांनी कर्जासाठी सावकाराकडे हात पसरू नये म्हणून पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत योजनेंतर्गत 50 हजारावरची कर्ज मर्यादा आता एक लाख रुपयापर्यंत करण्यात आली. यावर व्याज नसून एक ते तीन लाखापर्यंतच्या कर्जासाठी दोन टक्के व्याज आकारण्यात येईल. राजीव गांधी जीवन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील दोन कोटी लाभर्थ्यांना एक लाख रुपयापर्यंतचा मोफत औषधोपचार, जीवन सुरक्षा योजनेंतर्गत राज्यातील गरिबांच्या सामाजिक सुरक्षिततेची जबाबदारी शासनाने घेतली आहे. नागरिकांची कुचंबना होऊ नये म्हणून ई-प्रशासनाच्या माध्यमातून ई-सेवा दाखले देण्यात येत आहेत. राज्यातील संपूर्ण शेत जमिनीच्या पुनर्रमोजणीचा कार्यक्रम येत्या 5 वर्षात राबविण्यात येईल. बंदमुळे आणि कोळसा खाणीत पाणी गेल्यामुळे कोळशाची आयात घटल्याने राज्यात मानव नैसर्गिकरित्या विजेचे संकट निर्माण झाले होते. राज्यात विजेची मागणी वाढली असून जैतापूरसह नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यास वीज टंचाई दूर होईल. सध्या सोयाबीन मळणीचा हंगाम असल्याने शहरी भागात ज्यादा लोडशेडींग करून ग्रामीण भागात वीज पुरवठा करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
        पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी मिहान प्रकल्पाला राज्य शासनाने गती दिल्याने दोन महिन्यात कामे सुरु होतील. तसेच नगरपालिकेच्या विकासात अडथळा ठरणऱ्या झुडपी जंगलाचा प्रश्न सोडविण्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनीही मोहपा नगरपालिकेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
        माजी मंत्री रमेश बंग यांनी कापसाला सहा हजार रुपये भाव कापसावरील निर्यातबंदी उठविणे आणि मेट्रोरिजनमुळे अंशत: तालुका बाधित होत असल्याने त्यातून सूट मिळावी, अशी मागणी केली. श्री. वीरेंद्र बैस यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक नगरपरिषदेचे उपाध्यक्ष समशुद्दीन शेख यांनी केले. नगरपालिकेच्या विकास कामाची माहिती त्यांनी यावेळी दिली. आभार नगराध्यक्षा शीलाताई खाटीक यांनी मानले.
        बांधकाम सभापती नत्थुजी यावलकर, महिला बालकल्याण सभापती सौ. चांदेकर, शिक्षण सभापती बशीर पटेल, राजेश देशमुख, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. अमीत सैनी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, विद्याधर अंधारे,नगरपालिकेचे सदस्य, मोहपा परिसरातील नागरिक उपस्थित होते.