निरोप घेतो आता………..
नमस्कार, आज 6 जानेवारीच्या पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
गेली सुमारे पाच वर्षे मुख्यमंत्री सचिवालयात मुख्यमंत्री यांचा मुख्य जनसंपर्क अधिकारी या पदाची जबाबदारी मी सांभाळत होतो. आज सकाळी मी या पदावरुन
कार्यमूक्त झालो आहे. या काळात मा. श्री. अशोकराव चव्हाण, मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण आणि अल्पकाळ मा. श्री. देवेंद्र फडणवीस या मान्यवरांकडे काम करण्याची संधी मिळाली. ही पोस्टिंग मला वैयक्तिकरित्या खूप अनुभवसमृद्ध करणारी ठरली. या सर्व प्रवासामध्ये माझा निकटचा मित्र आणि सहकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे याचा मोलाचा सहभाग आहे. त्याचबरोबर सर्व पत्रकार
मित्रांचे सहकार्य आणि त्यांचे सततचे प्रोत्साहन यामुळेच मी या पदावर काम करताना स्वत:ची थोडीशी ओळख
निर्माण करु शकलो. माझ्या कुटुंबियांनीही माझा व्यस्त दिनक्रम समजून घेतला आणि
ॲडजस्ट केले. मेरुमणीची मात्र थोडीशी तक्रार असायची. अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन
मोठा मित्रवर्ग आणि लोकसंग्रह गाठीशी बांधुन मी मुख्यमंत्री सचिवालयाचा निरोप घेत
आहे. इथे काम करताना वेळेअभावी माझे छंद ( भटकंती, छायाचित्रण, लेखन, वाचन )
जवळपास बासनात बांधुन ठेवले होते. आता हे बासन सोडणार आहे. पुरातत्वशास्त्राचा
माझा अभ्यास मात्र मी या काळातही सुरु ठेवला. (फक्त फिल्ड व्हिजिट जमल्या नाहीत.)
सद्या गेल्या वर्षापासुन मी मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमधल्या डिपार्टमेंट
ऑफ एक्स्ट्रा म्युरल स्टडिज मध्ये पुरातत्वशास्त्राचा अभ्यासक्रम करतो आहे.
University of Rome चा ऑनलाईन कोर्सही पुरा करत आणला आहे. असो. आता मी माहिती व
जनसंपर्क महासंचालनालय या मूळ विभागात आलो आहे. येत्या काही दिवसात मला पोस्टिंगही
मिळेल. माझ्या सेवेची फक्त चार वर्षे उरली आहेत. त्यामुळे थोडीशी निवांत पोस्टिंग
घेण्याच्या विचारात आहे. या काळात फेसबुकनेही खुप चांगले मित्र दिले. फेबुच्या
माध्यमातून अनेकापर्यंत माझे अनुभव पोचवता आले. मुख्यमंत्री सचिवालयात काम
करतानाच्या बहुतेक गोड आठवणीच सोबत आहेत. कटु प्रसंग फारसे आले नाहीत, याचे
सारे श्रेय माझे सहकारी, वरिष्ठ आणि
पत्रकारांना आहे. नवीन सरकार आल्यानंतर नवीन टिम येणे हे नैसर्गिक आणि सहज आहे.
त्यामुळे येथून जाताना खंत नाही. शिवाय कुठेही असलो तरी शासनाचीच सेवा बजावायची
आहे. कोठेही असलो तरी फेसबुक, वॉटस्ॲप, ईमेल आणि प्रत्यक्ष भेटीतून भेटत राहणारच
आहोत. माझ्या कार्यकाळात जनसंपर्क कक्षात मी जी सेवा दिली त्यात ज्या त्रुटी
राहिल्या त्या सर्वस्वी माझ्या आहेत. जे काही चांगले घडले त्याचे श्रेय मी माझी
टिम आणि पत्रकारांना देतो. माझ्या 'सीएम ईवृत्तसेवा' ( www.mahacmpro.blogspot.in
) या ब्लॉगच्या प्रयोगालाही प्रसारमाध्यमांनी चांगला प्रतिसाद दिला. आता हा ब्लॉग
मी बंद करीत आहे. प्रत्येक सुरुवातीला शेवट असतोच. जनसंपर्क कार्यालयातील माझा
प्रवास हा अत्यंत समाधानात संपतो आहे, याचा आनंद आहे. जुदाईचा क्षण हा आनंद आणि दु:ख
असा संमिश्र असतो. या क्षणाबद्दल विल्यम शेक्सपिअर म्हणतो, “Parting is
such sweet sorrow that I shall say goodnight till it be morrow.” जॉर्ज इलियट म्हणते, “Only in the
agony of parting do we look into the depths of love.” टिम मॅकग्रा हा अमेरिकी गायक-अभिनेता म्हणतो की, “We all take
different paths in life, but no matter where we go, we take a little of each
other everyhwere.” टिम मॅकग्राच्या या म्हणण्याप्रमाणे मी पुढच्या मुक्कामावर जाताना तुमच्या
प्रत्येकाला थोडा थोडा माझ्यासोबत घेऊन जातो आहे. किती छान आहे ना कल्पना. तर Now it time to say Goodbye.
सर्वांचे पुन्हा एकदा
धन्यवाद.
- सतीश लळीत.