शुक्रवार, ४ जुलै, २०१४

राज्यात रेल्वेसाठी भरीव तरतूद करा
मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र

मुंबई दि. 4 : रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील जनतेच्या रेल्वेविषयक अपेक्षा पूर्ण कराव्यात आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.  यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जानेवारी महिन्यात रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिले होते,  त्याची एक प्रत सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांना देऊन या संदर्भात पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.
राज्य शासनाने एकंदर ८ प्रकल्पांमध्ये आपला ५० टक्के हिस्सा देण्यास मान्यता दिली असून त्यापैकी अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, तसेच वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन दोन रेल्वे मार्गांचे काम पुरेशा निधीअभावी रेंगाळले आहे तर ६ प्रकल्पांना अद्यापही मंजुरी प्रलंबित आहे.  हे प्रकल्प म्हणजे वडसा-गडचिरोली, आदिलाबाद-माणिकगड, कराड-चिपळूण, मनमाड-इंदौर, पुणे-नाशिक आणि नागपूर-नागभिड असे आहेत. राज्य शासन पुढील तीन वर्षात आपला हिस्सा देण्यास कटिबध्द असून रेल्वे मंत्रालयाने देखील यासाठी निधी द्यावा, जेणेकरून हे प्रकल्प तातडीने सुरु होऊ शकतील असे मुख्यमंत्री म्हणतात.
राज्यात नवीन रेल्वे सुरु करणे, प्रवाशांसाठी असलेल्या सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करणे यासंदर्भात राज्यातील खासदार, आमदार यांनी आवाज उठविला असून या अपेक्षांची पूर्तता होणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्री म्हणतात.  महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता इतर राज्याच्या तुलनेत या ठिकाणी रेल्वेचे जाळे अपुरे आहे, त्यामुळे नवीन रेल्वे मार्गाचे प्रकल्प सुरु करणे आवश्यक आहे.  यासाठी राज्य सरकार आपला आर्थिक भार उचलण्यासही तयार आहे. 
मुंबईतील रेल्वे सेवा सुधारावी
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय लोकल रेल्वे सेवेच्या पायाभूत सुविधामध्ये देखील अजून वाढ होणे आवश्यक आहे.  मध्यंतरी मुंबईमध्ये फ्लॅटफॉर्म आणि लोकलचा दरवाजा यातील मोठ्या अंतरामुळे  काही दुदैवी अपघात झाले.  फ्लॅटफॉर्मची उंची अनेक स्थानकावर कमी जास्त आहे.  त्यामुळे महिला, विद्यार्थी आणि वृध्द प्रवाशांना चढण्या उतरण्यास त्रास होतो.  यासंदर्भात देखील प्रवाशांची सुरक्षा कशी होईल हे पाहणे आवश्यक आहे.
मुंबईतील उपनगरीय रेल्वेतून दररोज ७५ लाख  प्रवाशी प्रवास करतात.  मात्र, अद्यापही मध्य रेल्वेवरील हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील बोरीवली, विरार, डहाणू या भागातून अधिकाधिक लोकल सेवा सुरु व्हावी अशी मागणी आहे.  याचा देखील तातडीने विचार व्हावा असे मुख्यमंत्री म्हणतात.
एमयुटीपी-२ या प्रकल्पासाठी ३७५ कोटी रुपये अंतरिम अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले होते.  ते ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढवावे.  त्याचप्रमाणे एमयूटीपी-३ या टप्प्यात पनवेल-कर्जत कॉरिडॉर आणि ऐरोली-कळवा या दरम्यान रेल्वेमार्गासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
अमरावती  जिल्ह्यातील बडनेरा येथे वॅगन दुरुस्ती कार्यशाळेस रेल्वे मंत्रालयाकडूनही लवकरात लवकर मंजुरी मिळावी.  या ठिकाणी जमीन संपादनाची कार्यवाही वेगाने सुरु आहे.  हा प्रकल्प लवकर सुरु झाल्यास या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक चालना मिळेल. 
पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी अर्ध महाकुंभमेळा आहे.  संपूर्ण देशातील लाखो भाविक यासाठी येतील.  यामुळे सध्याच्या नाशिक रोड, देवळाली आणि ओढा या स्थानकावर होणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी नवीन वाढीव सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे.  राज्य शासनानेही यासाठी आर्थिक तरतूद केली आहे असे मुख्यमंत्री पत्रात म्हणतात.
-----०

बुधवार, २ जुलै, २०१४

मुख्यमंत्री सचिवालय ट्विटरवर.....  PL follow @cmomaharashtra  on twitter

मंत्रिमंडळ निर्णय

टंचाई उपाय योजनांना 31 जुलै पर्यंत मुदतवाढ
टँकर सुरु करण्याचे अधिकार तहसिलदारांना

पाणी आणि वीज जपून वापरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

टंचाईग्रस्त क्षेत्रात टँकर सुरु करण्याचे अधिकार तहसिलदारांना देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  टँकरची बिले वेळेवर देण्याचे यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत. टंचाईवरील सर्व उपाययोजनांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.  हे उपाय योजताना पैसेवारी विचारात घेतली जाणार नाही.
राज्यात 30 जून पर्यंत 58.50 मी.मी. म्हणजेच सरासरीच्या 26.30 टक्के पाऊस झाला आहे.जून अखेर सरासरीच्या तुलनेत पडलेला पाऊस पुढील प्रमाणे-   355 तालुक्यांपैकी 194 तालुक्यात 0 ते 25 टक्के, 123 तालुक्यात 25 ते 50 टक्के, 28 तालुक्यात 50 ते 75 टक्के, 7 तालुक्यात 75 ते 100 टक्के आणि 3 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.  
केवळ 16 जिल्ह्यात 25 टक्के पाऊस
ठाणे, रायगड, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत 0 ते 25 टक्के तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर, परभणी, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत 25 ते 50 टक्के पाऊस झाला आहे. केवळ सांगलीत 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
पाण्याचा साठा केवळ पिण्यासाठीच राखावा
राज्यातील जलाशयात 19 टक्के साठा असून 1464 टँकर्सद्वारे 1359 गावांना  आणि 3317 वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. 35 पैकी 34 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे 1 जुलै 2014 ते 30 जून 2015 पर्यंतचे त्रैमासिक कृती आराखडे तयार करण्यात येणार आहेत. पहिला आराखडा 5 दिवसात सादर करावा आणि पुणे, नाशिक, औरंगाबाद या विभागातील पाण्याचा साठा अग्रहक्काने पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात यावा, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले.
पेरणीची कामे संथ गतीने
राज्यातील खरीपाचे सरासरी क्षेत्र 134.70 लाख हेक्टर असून 30 जून अखेर 8.43 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कापूस पिकाखाली 16 टक्के तर सोयाबीन पिकाखाली 4 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भात पिकाखाली कोल्हापूर विभागात सर्वाधिक 0.52 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची धूळफेक पेरणी झाली आहे. राज्यातील सर्व विभागात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु आहेत.    सरासरी क्षेत्राशी तुलना करता 6 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.  कोकण विभागात शून्य टक्के पेरणी झाली आहे. खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कापूस आदी पिकांच्या पेरणीचे काम कमी पर्जन्यमानामुळे संथ गतीने सुरु आहे.
बियाणे व खतांचा पुरेसा पुरवठा
खरीप हंगामाकरिता 19.96 लाख क्विंटल बियाणांच्या गरजेच्या तुलनेत 15.41 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत.  30 जून अखेर 58 टक्के बियाणांचा पुरवठा झालेला आहे. एप्रिल ते जून 2014 साठी 19.13 लाख मे.टन खतांचे नियोजन मंजूर करण्यात आले असून 30 जून पर्यंत 16.15 लाख मे.टन खतांचा पुरवठा करण्यात आला आहे.
-----०-----
एकाकी पदांवरील कर्मचाऱ्यांना  सुधारित ग्रेडवेतन देणार

पदोन्नतीची संधी नसलेल्या म्हणजेच एकाकी पदावरील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील ग्रेडवेतनामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी अंदाजे 9 कोटी रुपये वार्षिक खर्च अपेक्षित आहे.
12 वर्षे नियमित सेवेनंतरही पदोन्नतीमध्ये कुंठीतता राहिल्यास सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती  योजनेत त्याला पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी लागू केली जाते.  या योजनेत दुसरा लाभ पहिल्या लाभानंतर 12 वर्षाच्या सेवेनंतर लागू केला जातो.  मात्र, काही पदे एकाकी असल्याने अशा पदांना विशिष्ट वरिष्ठ वेतन संरचना (अतिरिक्त ग्रेडवेतन) 12 आणि 24 वर्षांनी लागू केली आहे.  या पदांना मिळणारा आर्थिक लाभ तुलनेने कमी असल्याने ही वाढ देण्यात आली आहे.
     12 वर्षाच्या नियमित सेवेनंतर   
ग्रेडवेतन 2000 पर्यंत असणाऱ्यांना विद्यमान पे बँडशी संलग्न ग्रेडवेतन अधिक 300 रुपये वेतन दिले जाईल.  तर 2001 ते 4000 रुपये ग्रेडवेतन असलेल्यांना 400 रुपये, 4001 ते 5000 रुपये ग्रेडवेतन असलेल्यांना 500 रुपये, 5001 ते 5400 रुपयांपर्यंत ग्रेडवेतन असलेल्यांना 600 रुपये सुधारित ग्रेडवेतन दिले जाईल.
     पहिल्या लाभाच्या प्राप्तीच्या दिनांकापासून 12 वर्षाच्या नियमित
     सेवेनंतर
ग्रेडवेतन 2000 पर्यंत असणाऱ्यांना विद्यमान पे बँडशी संलग्न ग्रेडवेतन अधिक 400 रुपये वेतन दिले जाईल.  तर 2001 ते 4000 रुपये ग्रेडवेतन असलेल्यांना 550 रुपये, 4001 ते 5000 रुपये ग्रेडवेतन असलेल्यांना 700 रुपये, 5001 ते 5400 रुपयांपर्यंत ग्रेडवेतन असलेल्यांना 800 रुपये सुधारित ग्रेडवेतन दिले जाईल.
-----०-----
 
वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांची
पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळणार

       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक गट ब हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. त्याचप्रमाणे सहयोगी प्राध्यापक गट अ व प्राध्यापक गट अ ही पदे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या धर्तीवर एक वर्षाकरिता लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. ही पदे भरण्यासाठी सध्याच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील.
-----०-----  
इंदू मिलची जागा डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकासाठी
देण्यासंदर्भात केंद्राला राज्य शासनाचे हमीपत्र

       केंद्रीय मंत्रिमंडळाने इंदू मिलची 4.84 हेक्टर जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासाठी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. याबाबतीत केंद्र शासनाने मागितल्याप्रमाणे हमीपत्र देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
       या प्रस्तावित स्मारकासाठी उपलब्ध्‍ा करून द्यावयाची इंदू मिल क्र.6 ची जागा फक्त डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकासाठीच वापरली जाईल व इतर कोणत्याही कारणास्तव वापरली जाणार नाही, स्मारकाच्या उभारणी संदर्भात राज्य शासनाकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीमध्ये केंद्र शासनाचा प्रतिनिधी असेल. तसेच स्मारकासाठी वापरण्यात येणारा चटई क्षेत्र निर्देशांक वगळता उर्वरीत चटई क्षेत्र निर्देशांकाचे क्षेत्र हस्तांतरणीय विकासहक्काचे (टीडीआर) स्वरुपात केंद्र शासनास उपलब्ध करून देण्यात येईल, असे हमीपत्र केंद्राला पाठविण्यात येईल.
-----०-----

बीड जिल्हा रुग्णालयात 200 खाटा वाढविण्याचा निर्णय

       बीड जिल्हा रुग्णालयात 200 खाटा वाढविण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. यामुळे आता या रुग्णालयात 500 खाटा होतील.
       यासोबतच अतिरिक्त 125 पदांची पदनिर्मिती करण्यात येणार आहे. या रुगणालयाचे श्रेणीवर्धन करण्यास आणि जागा उपलब्ध करून देण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
-----०-----


ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची लोकवर्गणी रद्द

       ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी असलेली 10 टक्के लोकवर्गणीची अट पुर्णत: रद्द करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला.
       यापूर्वी ज्या पाणी पुरवठा योजनांकरिता अंशत: लोकवर्गणी ग्रामस्थानी भरली असल्यास ही रक्कम संबंधित ग्रामपंचायतीस परत केली जाणार नाही. मात्र उर्वरीत लोकवर्गणीची तरतूद ही पाणी पुरवठा योजनेच्या किमतीत शासनामार्फत करण्यात येईल.
       ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेतदेखील सुधारणा करण्यात आली असून तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यतेच्या अधिकारात काही बदल करण्यात आले आहेत.
-----०-----
दोन स्वयंअर्थ सहाय्यीत विद्यापीठांना मान्यता

       पुणे येथे दोन स्वयंअर्थ सहाय्यीत विद्यापीठांना मान्यता देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला.
       अजिंक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, पुणे तसेच एम.आय.टी. युनिव्हर्सिटी, पुणे अशी ही विद्यापीठे असून 2014-15 या शैक्षणिक वर्षापासून ही मान्यता देण्यात आली आहे.
       ज्या खासगी संस्था स्वत:ची गुंतवणूक करून उच्चशिक्षणासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना उत्तम प्रतिचे व्यवसायाभिमुख शिक्षण देतील अशा संस्थांना स्वयंअर्थ सहाय्यीत विद्यापीठे स्थापन करण्याची परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

-----०-----