चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण केंद्रास
वन अकादमीचा दर्जा दिला जाईल
- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
देशातील पाचव्या कुंडल फॉरेस्ट ॲकॅडमीचा लोकार्पण सोहळा संपन्न
सांगली दि. 23 : वनविभागाच्या चंद्रपूर
येथील वन प्रशिक्षण केंद्रास वन अकादमीचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी आज येथे बोलताना दिली.
पलूस तालुक्यातील कुंडल येथील 100 कोटी खर्चाच्या देशातील
पाचव्या फॉरेस्ट ॲकॅडमी संकुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि राज्याचे वनमंत्री
डॉ. पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
झाला. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभास आमदार सदाशिव पाटील, आमदार आनंदराव पाटील,
सोनहिरा साखर कारखान्याचे चेअरमन मोहनराव कदम, भारती विद्यापिठाचे कार्यवाह
डॉ. विश्वजित कदम, वन विभागाचे प्रधान
सचिव प्रविणसिंह परदेशी,
राज्याचे मुख्य वनसंरक्षक ए.के. सक्सेना आदि मान्यवर उपस्थित होते.
कुंडल फॉरेस्ट ॲकॅडमी ही देशातील पाचवी
आणि राज्यातील पहिली
ॲकॅडमी असून या ऍ़कॅडमीतून देशातील
वन अधिकाऱ्यांना दर्जेदार
प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे स्पष्ट
करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, चंद्रपूर
येथे सद्या कार्यरत असलेल्या वन प्रशिक्षण केंद्राचे वन ॲकॅडमीत रूपांतर करण्याचा
निर्णय शासनाने घेतला
असून याबाबत प्राधान्याने उपाययोजना केल्या
जातील, असेही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
म्हणाले.
राज्यात वनक्षेत्र 33 टक्क्यापर्यंत वाढविण्याचा संकल्प.. मुख्यमंत्री
राज्यात वनक्षेत्र वाढविण्यास शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून सद्या असलेले 13 टक्के वनक्षेत्र 33 टक्क्यापर्यंत वाढविण्याचा शासनाचा
संकल्प असल्याचे सांगून
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
म्हणाले, वनक्षेत्र वाढविण्याच्या विविध उपाययोजनांबरोबरच राज्यात
दर पाच वर्षाला 100 कोटी झाडांची लागवड
करण्याचा धोरणात्मक निर्णय
शासनाने घेतला असून आत्तापर्यंत राज्यात
शतकोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत 50 कोटी झाडांची लागवड केली आहे. राज्यातील जनतेने शतकोटी वृक्षलागवड मोहिमेत
सक्रिय सहभाग घेवून संपूर्ण महाराष्ट्र वृक्षाछादित करण्यात पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पाणी आणि वनांचा असलेला संबंध यापुढील काळात अधिक दृढ आणि बळकट करण्यास शासनाने प्राधान्य दिल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
म्हणाले, पावसासाठी वृक्षराजी आवश्यक असून वृक्ष निर्माण करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी वनविभागामार्फत आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. या उपक्रमातून अधिकाधिक
वनांची वाढ होईल या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. कुंडल येथील
ॲकॅडमी परिसरात अधिकाधिक
वृक्ष लावून या परिसरात वनश्री
निर्माण करावी, अशी सूचनाही त्यांनी
यावेळी केली.
राज्यातील गावागावात झाडे जगविण्यासाठी वन व्यवस्थापन समित्यांचे काम महत्वाचे असून या पुढेही हे काम अधिक परिणामकारक करण्यात
गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा,
असे आवाहन करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, झाडांच्या संगोपनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडील पाण्याचे
टँकर उन्हाळयात झाडे वाचविण्यासाठी शासनाने मान्यता
दिली आहे. या पुढील
काळात गावागावाबरोबरच सर्व शासकीय कार्यालयामध्ये हिरवीगार
वनराई निर्माण करावी,
असे आवाहनही त्यांनी
केले.
राज्यात गेल्या पाच वर्षात शासनाने नव्याने
12 अभयारण्ये आणि 3 व्याघ्र प्रकल्प
निर्माण केले असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
म्हणाले, महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत वाढ झाली असून वन्य प्राण्यांचे संरक्षण
करण्यास शासनाने अधिक महत्व दिले आहे. याबरोबरच वन्य प्राणी क्षेत्र वाढविण्यात देशात महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यापुढील काळातही वनविभागाला अधिक प्रोत्साहन देण्याची
भूमिका राज्य शासनाने घेतली असून 6
हजार रोजंदारी वनरक्षकांना शासनाने सेवेत कायम केले आहे. तसेच वनविभागाची भरती प्रक्रियाही सोपी करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
सांगली जिल्ह्यास टंचाई कामासाठी 8 कोटीचा निधी.. मुख्यमंत्री
सांगली जिल्ह्यास टंचाई
निवारणाच्या कामासाठी 8 कोटीचा निधी देण्याची घोषणा करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जिल्ह्यातील टंचाई
निवारणाच्या उपाययोजनांसाठी विशेषत:
पाझर तलाव दुरुस्ती व
अन्य कामांसाठी 6 कोटी तर उर्वरीत 2
कोटी वनखात्याला दिले असून या निधीतून वनविभागाने जिल्हयात वनतळ्यांचा भरीव कार्यक्रम हाती घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी
केली.
जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचा
थेंब आणि थेंब अडवून तो जमिनीत मुरविण्याचे काम शासनाने एक मोहिम म्हणून हाती घेतल्याचे स्पष्ट
करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने
गेल्या तीन वर्षात सिमेंट बंधाऱ्यांचा मोठा कार्यक्रम हाती घेतला असून यापुढेही पाणी अडविण्याचे काम लोकांच्या सहभागातून केले जाईल, असेही ते म्हणाले.
वन विभागाची चौफेर प्रगती.. वनमंत्री डॉ. पतंगराव कदम
गेल्या पाच वर्षात वन विभागात चौफेर प्रगती करून या विभागाचा चेहरा
मोहरा बदलण्याचे महत्वपूर्ण काम शासनाने केले असल्याचे सांगून वनमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, राज्यात वन विभागाच्या माध्यमातून नवनवे
प्रकल्प हाती घेण्यात आले असून शतकोटी वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम हाती घेऊन आतापर्यंत 50 कोटी झाडे लावण्यात आल्याचेही ते म्हणाले. राज्यात गेल्या
तीन -
चार वर्षात 12 नवीन अभयारण्ये विकसीत करण्यात आली असून 3
व्याघ्र प्रकल्प मंजूर
केले आहेत. तसेच 7 हजार लोकांना बायोगॅस
उपलब्ध करून दिले आहेत.
देशातील पाचवी आणि पश्चिम भारतातील पहिली फॉरेस्ट ऍ़कॅडमी कुंडल येथे 29 एकर जागेवर स्थापन करण्यात आल्याचे सांगून वनमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, या ऍ़कॅडमीमुळे जिल्हयाचे नांव देशपातळीवर कोरले गेले असून या ऍ़कॅडमीमध्ये देशातील वनपाल, वनक्षेत्रपाल आणि सहाय्यक वनसंरक्षक अशा वनाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. 100 कोटीच्या या प्रकल्पावर आतापर्यंत 50 कोटीचा खर्च करण्यात आल्याचेही वनमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले.
कुंडल फॉरेस्ट ऍ़कॅडमी संकुलाच्या लोकार्पण सोहळयाप्रसंगी संत तुकाराम वनग्राम योजनेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि वन व वन्यजीव संरक्षणात केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदक वितरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संत तुकाराम वनग्राम योजना पुस्तिकेचे आणि दुष्काळाशी लढा या पुस्तकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी या ऍ़कॅडमीचे महासंचालक नरेश झुरमुरे यांनी स्वागत केले. वन विभागाचे प्रधान सचिव प्रविण परदेशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. समारंभास जिल्हाधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश लोखंडे, पोलीस अधिक्षक दिलीप सावंत, मुख्य वनसंरक्षक हुसेन, कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, क्रांती कारखान्याचे चेअरमन अरूण लाड, पलूस तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष महेंद्रआप्पा लाड, सभापती यास्मीन पिरजादे यांच्यासह विविध विभागांचे मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---000---